Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अँबुलन्स न मिळाल्याने महिलेस हातगाडीवरून हॉस्पीटलमध्ये नेले : भुसावळातील धक्कादायक प्रकार

भुसावळ प्रतिनिधी । वेळेवर रूग्णवाहिका न मिळाल्याने तिला हातगाडीवरून हॉस्पीटरमध्ये नेण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना भुसावळ येथे घडली असून याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकार्‍यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ येथे २ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास न्यू एरिया सब्जीमंडी भागातील रहिवासी कमलाबाई मनोहर मालवे (वय ५३) यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान अचानक ब्लडप्रेशर वाढीचा त्रास होऊ लागला. यामुळे परिवारातील सदस्य व नातेवाइकांनी अॅम्ब्युलन्ससाठी पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात संपर्क केला. मात्र तब्बल अर्धातास प्रयत्न करूनही फोनवर संपर्क झाला नाही. यामुळे खासगी रुग्णवाहिकेच्या चालकांसोबत संपर्क करण्यात आला. मात्र बऱ्याच अॅम्ब्युलन्स बाहेरगावी असल्याने उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. दुसरीकडे महिलेची प्रकृती अत्यवस्थ होत असल्याने शेजारी व नातेवाइकांनी थेट हातगाडीवर गादी टाकून त्यावर महिलेस झोपवले. तशाच अवस्थेत नातेवाइकांनी दीड किमी अंतर हातगाडीवर पार करत मानवतकर हॉस्पिटल गाठले. तेथे तत्काळ आयसीयूमध्ये भरती केल्यानंतर उपचार झाल्याने महिलेचे प्राण वाचले.

नातेवाईकांना रुग्णवाहिका न मिळाल्याने या महिला रुग्णाला चक्क हातगाडीवर रुग्णालयात नेण्याची वेळ आली. यामुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला संपर्क केला मात्र आठ वाजे नंतर रुग्णवाहिकेचे चालक उपलब्ध नसल्याचे उडवाउडवीची उत्तरे नातेवाईकांना देण्यात आल्याचा आरोप या महिला रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या संदर्भात मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी संबंधीत दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Exit mobile version