नवी दिल्ली , वृत्तसंस्था । मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह एकूण १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर खासदारांमध्ये प्रवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटिल, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांचा समावेश आहे . .
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सगळ्या खासदारांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १७ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आज खासदारांनी अटेंडन्स अॅपद्वारे हजेरी लावली. त्यांना कोरोना किटसह मास्क सॅनेटायझर देण्यात आले. सोमवारी ही सगळी प्रक्रिया खासदारांना समजली. लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचं आवरणही लावण्यात आलं आहे. उभं राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदारांना बसूनच त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. आज लोकसभेत ३५९ खासदारांची हजेरी होती. पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस होता.
देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ४८ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान आत्तापर्यंत ३७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तपर्यंत ७८ हजारांपेक्षा जास्त लोकांचा देशभरात मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.