मुंबई : वृत्तसंस्था । पूरस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याचं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरु आहेत. सीईटी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
मुंबई, पुणे, अमरावती, सोलापूर या विद्यापीठात विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं ही बाब आमच्या लक्षात आली आहे. काही प्रमाणात आढावा घेताना समजलं की परीक्षा घेताना काही त्रुटी राहिल्या आहेत. पूरस्थिती, कोविड आणि तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना परीक्षा देता आल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपूर्वी परीक्षा देण्याची संधी मिळेल. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षेसंदर्भात जो सायबर हल्ला झाला त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. अमरावती विद्यापीठादरम्यान परीक्षेबाबत गोंधळ झाला. त्यामध्ये परीक्षांचं काम दिलेल्या कंपनीने सहकार्य न केल्याने हा गोंधळ झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.