हार्दीक पटेल बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रार

शेअर करा !

hardik patel news 1553855400

अहमदाबाद । काँग्रेसचे नेते हार्दीक पटेल हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी किंजल यांनी नोंदवल्याने खळबळ उडाली आहे.

store advt

पाटीदार समाजाचे नेते तथा काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी सांगितले आहे. तसेच गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना टार्गेट करत असल्याचा आरोपही किंजल यांनी केला आहे. हार्दिक पटेल यांच्यावर २०१५ च्या पाटीदार आरक्षण आंदोलनासंबंधित देशद्रोहाचा खटला सुरु आहे. याप्रकरणी त्यांना १८ जानेवारीला अटकही झाली होती. मात्र अटकेनंतर हार्दिकची कोणतीही माहिती नसल्याचा दावा किंजल यांनी केला आहे. तसेच पोलीसही याबाबत काही माहिती देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पाटीदार आरक्षण नेत्यांच्या वतीने आजोजित केलेल्या कार्यक्रमात किंजल यांनी, हार्दिक पटेल यांना १८ जानेवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची काहीही माहिती नाही. ते सध्या कुठे आहेत याची आम्हाला माहिती नाही. मात्र पोलीस वारंवार येऊन आम्हाला त्यांचा पत्ता विचारत आहे. हार्दिक पटेल यांना टार्गेट करण्यात येत असून भाजपमध्ये गेलेल्या इतर पाटीदार नेत्यांवर अशी कारवाई होत नाही. हार्दिक पटेल यांनी लोकांना भेटावे अशी गुजरात सरकारची इच्छा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खटल्यासाठी सातत्याने गैरहजर राहणारे हार्दिक पटेल यांना १८ जानेवारीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी हार्दिक पटेल यांची चार दिवसांनंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र पाटन आणि गांधीनगर येथील दोन प्रकरणात त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणात २४ जानेवारीला त्यांना जामीन मिळाला होता. न्यायालयाने पुन्हा त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट जारी करण्यात आले. यानंतर त्यांचा कोणताही पत्ता लागत नसल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हार्दिक पटेल बेपत्ता असले तरी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. आपच्या दिल्लीतील विजयानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर अभिनंदन केले. तर ११ फेब्रुवारीला केलेल्या दुसर्‍या ट्वीटमध्ये म्हटले की, चार वर्षांपूर्वी गुजरात पोलिसांनी माझ्याविरोधात खोटा खटला दाखल केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी माझ्या विरोधात दाखल झालेल्या खटल्यांची यादी मागितली होती, मात्र हे प्रकरण त्या प्रकरणांच्या यादीमध्ये नव्हते. पंधरा दिवसांपूर्वी अचानक पोलीस मला ताब्यात घेण्यासाठी घरी आले, मात्र मी घरी नव्हतो. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. जामिनाची प्रक्रिया उच्च न्यायालयात सुरु आहे. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मला जेलमध्ये बंद करण्याचे षडयंत्र आहे. मी भाजपविरोधातील लढाई लढत राहीन, लवकरच भेटू.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!