जळगाव, प्रतिनिधी । शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून प्रभाग समिती कार्यालयांचे बळकटीकरण नसल्याने सर्व भार मनपावर पडत आहे. प्रत्येक प्रभाग समितीचे कार्यालय स्वतंत्र असावे अशी मागणी नगरसेवकांनी केली असता त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपमहापौर सुनील खडके यांनी दिले.
‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १२ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक अनंत जोशी, नितीन बरडे, ज्योती बेंडाळे, गायत्री राणे, माजी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, चंदन महाजन आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.
पार्वतीनगरातील मोकळ्या जागेचे सपाटीकरण करा
पार्वती नगरातील झोराष्ट्रीयन हॉलजवळ असलेल्या मनपाच्या मोकळ्या जागेवर मुरूम आणि खडक पडून आहेत. तसेच जागोजागी गवत उगवले असून जागा ओबडधोबड झाली असल्याची तक्रार नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देत आजच्या आज जेसीबीच्या साहाय्याने जागेचे सपाटीकरण करण्याचे सांगितले. पार्वती नगरातील एका कुटुंबात एका व्यक्तीचे नुकतेच कोरोनाने निधन झाले असून घर तसेच परिसर सॅनिटाईज केला नसल्याचे त्या कुटुंबियांनी सांगितले. उपमहापौरांनी त्या कुटुंबियांचे सांत्वन करून लागलीच आरोग्य विभागाकडून घर आणि परिसर निर्जंतुक करण्याच्या सूचना केल्या.
गिरणा टाकी परिसरात कायम स्वरूपी मनपा कर्मचारी नेमावे
गिरणा पंपिंग स्टेशनच्या पाण्याच्या टाक्या जीर्ण झाल्या असून एक टाकी उघडी असल्याने ती धोकेदायक आहे. काही दिवसांपूर्वी एक महिला आपल्या मुलासह त्याठिकाणी आत्महत्त्या करण्यासाठी आली असल्याची बाब नगरसेवकांनी लक्षात आणून दिली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच अधिकाऱ्यांना सूचना देऊन गिरणा टाकी परिसरात कायम लक्ष देण्यासाठी मनपाचा एक कर्मचारी नेहमी असावा असे सांगितले.
अमृत योजनेच्या मक्तेदार प्रतिनिधीची कानउघडणी
नवीन पोस्टल कॉलनी, भूषण कॉलनी परिसरात अनेक ठिकाणी अमृतच्या चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी चाऱ्या बुजविण्यात आल्या नाही तर काही ठिकाणी नळ संयोजन देणे बाकी असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ मक्तेदार प्रतिनिधीला बोलावून त्याची कानउघडणी केली. तसेच चाऱ्या लवकरात लवकर बुजवून रस्ते करावे. भूषण कॉलनीतील मुख्य रस्त्यावरील माती बाजूला करून रस्ता मोकळा करावा आणि चाऱ्या सपाटीकरण करून नागरिकांना लागलीच नळ संयोजन द्यावे, अशा सूचना केल्या.
मोकळ्या जागा विकसित करा, रस्ते दुरुस्त करा
शास्त्री नगर परिसरातील ओपन स्पेस विकसित करावी, प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या. तसेच नूतन अजिंठा हौसिंग सोसायटी, पार्वती नगरातील मुख्य रस्ता डागडुजी करावी असेही ते म्हणाले. श्रद्धा कॉलनीतील तीन विद्युत खांब समोरील बाजूस स्थलांतरित करावे अशी मागणी नागरिकांनी केली असता त्याबाबत महावितरणकडे पाठपुरावा करावा असे सांगितले तसेच मनपाकडून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले.
नगरसेवकांकडून फटाके फोडून स्वागत
प्रभाग १२ मध्ये दौरा करण्यासाठी उपमहापौर सुनील खडके पोहचले असता शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे आणि अनंत जोशी यांनी फटाके फोडून स्वागत केले. तसेच उपमहापौरांना पुष्पगुच्छ देत संपूर्ण प्रभागाची माहितीही स्थानिक नगरसेवकांनी दिली.