स्त्रीयांच्या आत्मभान जागृतीसाठी स्त्रीकेंद्रित काव्याची निर्मिती – हिरा बनसोडे

भुसावळ प्रतिनिधी । वेदकाळात मैत्रेयी, गार्गी यासारख्या स्त्रीयांना मुक्त वातावरण असल्याने त्या प्रगती करू शकल्या. अशाच पद्धतीने स्त्रीशिक्षण मिळून त्यांना सन्मान मिळावा व त्यांचे आत्मभान जागृत व्हावे यासाठी माझ्या कवितेने स्वप्नाळू कवितेकडून स्त्रीकेंद्रित कवितेकडे कूस बदलली, असे प्रतिपादन बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील “आरशातील स्त्री” या कवितेच्या कवयित्री हिरा बनसोडे यांनी केले.

store advt

बारावी मराठी युवकभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद या उपक्रमांतर्गत कवयित्री बनसोडे बोलत होत्या. प्रारंभी बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी दहावी व आताच्या बारावी उपक्रम आयोजनाचा हेतू कथन केला. बारावी युवकभारती उपक्रम यशस्वीतेसाठी हनुमंत कुबडे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली माय मराठी महाराष्ट्र संघ समर्थपणे परिश्रम घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील डिस्ले (बारामती) यांनी उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. कवयित्री हिरा बनसोडे यांचा परिचय गणेश सूर्यवंशी (जळगाव) यांनी करून दिला. इझी टेस्टचे मुरलीधर भुतडा यांनी तांत्रिक सहकार्यासाठी केव्हाही तयार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कवयित्री हिरा बनसोडे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, मी आधी स्वप्नाळू कविता लिहायचे. दरम्यान, स्वातंत्र्याआधीचा माझा जन्म असल्याने स्त्रीयांवरील अत्याचार मी पाहिले आणि ऐकले आहे. त्यामुळे स्त्रीयांना आपल्या साहित्यातून न्याय मिळवून देण्यासाठी स्वप्नाळू कवितांकडून स्त्रीकेंद्रित कविता अशी माझ्या कवितेची वाटचाल झाली. फिर्याद या काव्यातून स्त्रीयांच्या व्यथा आणि वेदना मांडल्या. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला ही आमची फिर्याद आहे असे वाटले. बारावी पाठ्यपुस्तकातील “आरशातली स्त्री” या कवितेत स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेतला असल्याचेही कवयित्री बनसोडे म्हणाल्या. ऐंशी वर्षांचे वय असतानासुद्धा त्यांनी आपल्या वाणीतून आरशातली स्त्री व फिर्याद ही कविता अप्रतिम सादर केली. ऑनलाईन संवाद सत्रात संपूर्ण महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार प्रा. गणेश सूर्यवंशी त्यांनी मानले.

error: Content is protected !!