सुशांत सिंहच्या पित्याची याचिका फेटाळली ; ‘न्यायः द जस्टिस’चा मार्ग मोकळा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी सुशांतच्या बायोपिकविरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे.

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूवर आधारित ‘न्यायः द जस्टिस’ या सिनेमावर स्थिगिती आणण्याची मागणी सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी केली होती. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

 

न्या  संजीव नरुला यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. ‘न्यायः द जस्टिस’ या सिनेमात सुशांत सिंह राजपूतच्या खासगी आयुष्यबद्दल खुलासा करण्यात आला असून यात त्याचं नाव, करिअर आणि अनेक गोष्टींमध्ये समानता आहे. यामुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम होवू शकतो असं म्हणत सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. अनेक जण सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेत आहेत असे आरोप करत या वर्षाच्या सुरुवातीला सुशांतच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली होती.

 

“सुशांत सिंहच्या आत्महत्येवरुन अनेक तर्क वितर्क लढवले जात असून अनेकजण वेगवेगळ्या कथा रचत आहेत. यामुळे  त्याच्या व कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जात आहे.” असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता.

 

कोणत्याही परवानगी शिवाय सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्याशी निगडीत सिनेमा बनवणं किंवा पुस्तक प्रकाशित करणं म्हणजे मुलभूत हक्काचं उल्लघन करणं आहे. त्यामुळे यासाठी कादेशीर परवानगी घेणं आवश्यक असल्याचं सुशांतच्या वडिलांचं म्हणणं आहे.

 

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने दिग्दर्शक दिलीप आणि निर्मात्या  सरला सराओगी यांना कोर्टाच्या सुनावणीपर्यंत सिनेमा रिलीज न करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सिनेमा ११ जूनला प्रदर्शित करण्याचं या आधी ठरलं होतं.

 

१४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडसह संपूर्ण देश हादरून गेला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अद्यापही सीबीआय चौकशी सुरु आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.