सुटी रद्द ; सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच उरकली महिला कॉन्स्टेबलची हळद !

 

 

जयपूर: वृत्तसंस्था ।  देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलिसांवरील ताण प्रचंड वाढला आहे. वाढीव कामामुळे  पोलिसांना सुट्टी मिळणे अवघड आहे. राजस्थानमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस ठाण्यातच हळद लावण्याची वेळ आली.

 

राजस्थानच्या डुंगरपूर परिसरातील एका पोलीस ठाण्यातील या हळदी समारंभाची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोलीस ठाण्यातील आशा रोत या महिला कॉन्स्टेबलचे 30 एप्रिलला लग्न आहे. मात्र, शहरात लॉकडाऊन लागल्याने आशा रोत यांना सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे महिला सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच आशा रोत यांना हळद लावली.

 

 

या पोलीस ठाण्याचे प्रमुख दिलीप दान यांनी म्हटले की, आशा रोत यांचे हिराता हे गाव शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. 30 एप्रिलला त्यांचे लग्न आहे. सध्या लॉकडाऊन लागल्याने पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

 

लॉकडाऊनमुळे सुट्ट्या रद्द केल्यानंतर आशा रोत यांना घरी जायला मिळणार नाही हे समजल्यानंतर सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच त्यांना हळद लावायचे ठरवले. याबद्दल आशा यांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. ठरलेल्या मुहूर्तानुसार सहकाऱ्यांनी आशा रोत यांना हळद लावण्यासाठी बोलावले. येथील स्थानिक परंपरेनुसार हळदीच्या वेळी नवरीला एका खाटेवर बसवून हवेत उडवून पुन्हा झेलले जाते.

 

आशा रोत यांचे लग्न गेल्यावर्षीच ठरले होते. मात्र, तेव्हादेखील लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पोलीस ठाण्यात हळदीचा समारंभ झाल्यानंतर आशा यांना लग्नासाठी सुट्टी देण्यात आली आहे. आता त्या आपल्या गावी रवाना झाल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावर आशा यांना खुर्चीवर बसवून हळद लावतानाची छायाचित्रं व्हायरल होत आहेत.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.