पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या सांगवी येथील विवाहितेला हॉटेल व्यवसाय करण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे अशी मागणी करीत विवाहितेचा वारंवार मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरून पतीसह सात जणांवर पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील सांगवी येथील विवाहिता ममता आबा पाटील (२४) ही १७ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाल्याची फिर्याद विवाहितेचा पती आबा सहादू पाटील यांनी पाचोरा पोलिसात दाखल केली होती. ही महिला १८ रोजी सकाळी सांगवी गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीत मयत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
पतीसह सासरची मंडळी हे ममता हिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असून वारंवार हॉटेल व्यवसायासाठी पैश्याची मागणी करीत होते या त्रासाला कंटाळून ममताने आत्महत्या केली असल्याची तक्रार तिचा भाऊ अमोल नाना सोनवणे (शिंदोळ ता.सोयगाव) यांनी दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मयत विवाहितेचा पती आबा सहादू पाटील, निर्मलाबाई पाटील (सासू), शीतल ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर पाटील (दिर), रंजना बालू पाटील, रमेश नवल पाटील, रत्ना रमेश पाटील,(ननंद) या सात जणांवर पाचोरा पोलिसात गु.र.नं. ३६१/ २०२० भादवी कलम ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व सातही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे यांच्यासह नगरदेवळा दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी करीत आहेत.