सहा पाणबुड्यांसाठी ५० हजार कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय नौसेनेसाठी संरक्षण मंत्रालयानं आणखी सहा ‘मेड इन इंडिया’ पाणबुड्या निर्माणासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत

 

दीर्घकाळापासून मंजुरीच्या प्रतिक्षित असणाऱ्या ‘प्रोजेक्ट ७५ इंडिया’ अंतर्गत सहा पाणबुड्या उभारणीसाठी संरक्षण मंत्रालयानं आता हिरवा कंदील दिलाय.

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत ५० हजार कोटी रुपयांच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. डीएसी ही संरक्षण मंत्रालयासाठी खरेदी संबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च यंत्रणा आहे.

 

हा प्रकल्प स्वदेशी कंपनी ‘माझगाव डॉक्स लिमिटेड’ आणि ‘एल अँड टी’कडे सोपवण्यात आला आहे. दोन्ही कंपन्या परदेशी शिपयार्डसोबत मिळून हा प्रकल्प पूर्ण करणार आहे.

 

समुद्री भागात आपली ताकद वाढवण्यासाठी भारतीय नौदलानं या प्रकल्पाची सुरुवात केलीय. या प्रकल्पांतर्गत सहा मोठ्या डिझेल-इलेक्ट्रिक बेस्ड पाणबुड्या उभारण्यात येणार आहेत. सध्या नौदलात दाखल असलेल्या स्कॉर्पियन क्लासच्या पाणबुड्यांहून ५० टक्के मोठ्या आकाराच्या या पाणबुड्या असतील.

 

हेवी ड्युटी फायरपॉवरची सुविधा असलेल्या पाणबुड्यांची गरज भारतीय नौदलानं व्यक्त केलीय. अँन्टी-शिप क्रुझ मिसाईलसोबत १२ लँड अटॅक क्रूझ मिसाईलदेखील तैनात करण्यासाठी अशा पद्धतीच्या पाणबुड्यांची आवश्यकता आहे.

 

याशिवाय १८ हेवीवॅट टॉपरपीडो वाहण्याची या पाणबुड्यांची क्षमता असायला हवी, अशी मागणी भारतीय नौदलाकडून करण्यात आलीय. नौदलाकडे सध्या १४० पाणबुड्या आणि युद्धनौका आहेत.

 

पाकिस्तानी नौदलाकडे केवळ २० पाणबुड्या आणि युद्धनौका आहेत. परंतु, भारताचा समुद्री भागातील शत्रू केवळ पाकिस्तान नाही तर चीनदेखील आहे. चीनकडून हिंद महासागरात आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे, अरबी समुद्रापासून ते श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्यांपर्यंत भारतीय नौदलाची नजर आहे.

 

संरक्षण मंत्रालयानं आजच्या बैठकीत ‘बाय अँड मेक’ श्रेणी अंतर्गत जवळपास ६००० कोटी रुपयांच्या बंदुका आणि दारुगोळा खरेदीच्या भारतीय सेनेच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.