सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र परिणाम होणार नाही — शरद पवार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । परमवीर सिंग यांच्या पत्राच्या संदर्भाने  राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही,” असं आज शरद पवारांनी स्पष्ट केलं.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याचे राज्यात पडसाद उमटत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य करत भूमिका मांडली. देवेद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं आहे. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, असं पवार म्हणाले.

 

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राविषयी बोलताना शरद पवार म्हणाले,”परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. यात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही. पत्रकार परिषदेपूर्वीच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

 

 

“सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आलं. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी , असेही शरद पवारांनी सांगितले . .

Protected Content