संगायोची बैठक ऑनलाईनघ्यावी : डॉ.विवेक सोनवणे यांची मागणी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत जिल्ह्यात सर्वत्र संजय गांधी निराधार योजनेची बैठक ऑफलाईन घेण्यात येत असल्याचा निषेध करत ही बैठक ऑनलाईन या प्रकारातच घ्यावी अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी केली आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सांगायो मीटिंग ही ऑनलाईन घेणे बंधनकारक असून  मुक्ताईनगर सह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सांगायो मीटिंग ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत असून लाभार्थ्यांची होणारी फरपट थांबवण्यासाठी सांगायो मीटिंग ऑनलाइन घेण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

 

या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतांना डॉ. सोनवणे यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाने विधवा ,दिव्यांग, वयोवृद्ध ,निराधार या समाजातील गोरगरीब घटकांसाठी संजय गांधी निराधार, इंदिरागांधी वृद्धापकाळ , श्रावण बाळ योजना या विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा मानधन दिले जात असून त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता आपले सरकार सेवा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने जमा करून त्यांची   संबंधित तालुका प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने सदर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची तपासणी ऑनलाइन करणे मागील तीन वर्षांपासून बंधनकारक आहे परंतु मुक्ताईनगर सह जिल्ह्यामध्ये कुठेही ऑनलाइन पद्धतीने मीटिंग घेतली जात नसून प्रत्येक तालुक्यात ऑफलाइन पद्धतीनेच लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे त्यामुळे राजकीय हस्तक्षेप ,

वशिलेबाजी प्रशासनाच्या दलालांकडून आर्थिक पिळवणूक होत आहे.

 

निवेदनात पुढे नमूद केले आहे की, राजकीय हस्तक्षेपामुळे खरोखर गोरगरीब शोषित पीडित  लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याच्या तक्रारी मुक्ताईनगर सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत याबाबत पीडित लाभार्थ्यांनी तालुका प्रशासनाला जाब विचारला असता उडवा उडवी चे उत्तर देण्यात येतात तसेच मुक्ताईनगर सह जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सन २०२३ चे प्रकरण निकाली काढण्यात आलेले असून मागील दोन वर्षांपूर्वीचे प्रकरण अजूनही प्रलंबित आहेत.  नियमानुसार सर्व तालुक्यांमध्ये सांगायो मीटिंग ऑनलाईन झाली तर तालुक्यापासून ७० किलोमीटरवर राहणार्‍या लाभार्थ्याला त्याच्या गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्रावर त्याने दाखल केलेल्या प्रकरण मंजूर ,

नामंजूर किंवा काही त्रुटी निघाल्यास याबाबत संबंधित लाभार्थ्याला तेथेच समजू शकते. तसेच नियमानुसार ऑनलाइन असल्यामुळे कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा वशिलेबाजीचा त्रास शोषित पीडित लाभार्थ्यांना होणार नाही तसेच  लाभार्थ्याला मोल मजुरी बुडवून तालुक्याच्या ठिकाणी आपल्या प्रकरणाचे स्टेटस बघण्यासाठी येण्याची आवश्यकता भासणार नाही व त्याचे आर्थिक शोषण व विनाकारण होणारी मानसिक, शारीरिक हेडसाड थांबून त्याला नियमानुसार लाभ मिळू शकतो.

 

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सांगायो लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी ही ऑनलाइनच होऊन मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रलंबित असलेले प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात येऊन जिल्हा व तालुका प्रशासनाच्या संगणमताने जिल्ह्यातील शोषित पीडित जनतेची हेडसांड थांबवण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आर्थिक हितसंबंधापोटी गोरगरीब जनतेला सांगायो योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणार्‍या प्रशासनाच्या निषेधार्थ भीक मांगो आंदोलन छेडण्यात येईल असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content