शिवाजी नगरात कौलारू घर कोसळले; पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरमधील दारफळ जवळ पावसामुळे एक कौलारू घर कोसळले. त्यात एक तरूण जखमी झाला. घर कोसळल्याने कुटुंबिय रस्त्यावर आले आहे. यावेळी तलाठी यांनी पंचनामा केला. शासनाकडून तातडीने मदत व्हावी अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर परिसरातील शिवमंदीराजवळ शुभम मोहनलाल पुरोहित यांचे कौलारूसह पत्र्याचे घर आहे. शुभम मोहनलाल पुरोहित हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. काल सोमवारी १३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे आज १४ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कौलारू व पत्र्याचे असलेले घर कोसळले. यात शुभम किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. दरम्यान, या घटनेबाबत महापौर जयश्री महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांना माहिती देण्यात आली. दोन्ही लोकनेत्यांनी तातडीने तालुका प्रशासनाला घटनेची माहिती देवून तातडीने पंचनामा करण्याच्या सुचना देवून शासनाच्या वतीने तातडीने आर्थिक मदत देण्याची विनंती केली. या घटनेमुळे पुरोहित कुटुंबिय रस्त्यावर आले आहे. तलाठी यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. याप्रसंगी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह पुरोहित कुटुंबिय उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!