शिरसाड येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी अभियान कार्यशाळा संपन्न

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथे दि. २५ मार्च रोजी केंद्राची केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी अभियान कार्यशाळा सहभागी सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जि. प. प्राथमिक शाळा शिरसाड येथे संपन्न झाली.

यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख , शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके यांनी उपस्थिती देऊन बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शासनाचा हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यशाळेचे सुलभक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड शाळेचे वरिष्ठ शिक्षक राजाराम खजान मोरे व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा साकळी शाळेचे सहाशिक्षक भारत पाटील हे होते. दोन्ही सुलभकांनी दिवसभर उपस्थितांना कार्यशाळेत प्रोजेक्टरवर विविध ध्वनिचित्रफीती दाखवत मार्गदर्शन करून खिळवत ठेवले. त्याचबरोबर या कार्यशाळेत साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना या कार्यशाळेची आवश्यकता नमूद केली.

दुपार सत्रात मार्च अखेर पुढील वर्षी शाळेत इयत्ता १लीमध्ये प्रवेशित होणाऱ्या बालकांचा त्यांच्या पालकांसह घ्यावयाच्या मेळाव्याचे प्रात्यक्षिक उपस्थितांचे दोन गट करून घेण्यात आले. यावेळी दोन्ही गटात सहभागी शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांनी त्यांना नेमून दिलेल्या भूमिकेत स्वतःला उतरवत मुख्याध्यापक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षक, अधिकारी, शिक्षक विद्यार्थी, पालक यांची भूमिका पार पाडून कार्यशाळा यशस्वी केली. प्रात्यक्षिकात शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके यांनी स्वतः सहभाग नोंदवत इतर शिक्षक आणि अंगणवाडी सेवकांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रत्यक्षिकाच्या रूपाने शाळेवर घ्यावयाच्या मेळाव्याची जणू रंगीत तालीमच चालू असल्याचे भासत होते. कार्यशाळेत घेतलेल्या प्रात्यक्षिक आणि इतर कृतींवर मंगला सपकाळे मॅडम, संगिता पाटील मॅडम, दीपक वसंतराव चव्हाण सर यांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया मांडल्या. शाळा पूर्वतयारी अभियान शाळास्तरावर यशस्वीपणे राबवू हा दृढनिश्चय यावेळी उपस्थितांनी बोलून दाखवला. सूत्रसंचालन समाधान कोळी सर यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content