नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शाहीन बागमधील आंदोलस्थळी कडाक्याच्या थंडीमुळे चार महिन्याच्या चिमुकल्याचा गेल्या आठवड्यात मृत्यु झाला आहे. आपला मुलगा गमावूनही आई-वडील अद्यापही शाहीन बाग येथील आंदोलनस्थळी ठाण मांडून आहेत.
शाहीन बाग येथे खुल्या जागेत आंदोलनादरम्यान चार महिन्यांच्या या मुलाला थंडीचा त्रास झाला. त्याला प्रचंड सर्दी आणि छातीमध्ये कफ झाला होता. त्यामुळे त्याला श्वसनाला त्रास होऊ लागल्याने मृत्यू झाला. मात्र, त्याची आई अद्यापही आंदोलनात सहभागी होण्यावर ठाम आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे आंदोलन माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. मृत्यू पावलेल्या मोहम्मद जहाँ याचे आई-वडिल नाजिया आणि आरिफ हे दिल्लीतल बाटला हाऊस परिसरात प्लास्टिक आणि जुन्या कपड्यांच्या सहाय्याने बनवलेल्या छोट्याशा झोपडीत राहतात. त्यांना आणखी दोन मुले आहेत यांमध्ये पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा आहे. आरिफ ई-रिक्षा चालवण्याचे काम करतात तर त्यांची पत्नी नाजिया त्यांना इतर कामात मदत करते.