शरीफ यांनी मोदींच्या मदतीने इम्रान यांचा फोन हॅक केला ; पाकिस्तानच्या मंत्र्याचा आरोप

 

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था ।  पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने इम्रान खान  यांचा फोन हॅक केल्याचा सनसनाटी आरोप पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री फारुख हबीब यांनी केलाय.

 

‘आपल्या राजकीय विरोधकांचा’ खासगी डेटा गुप्तपणे मिळवण्यात शरीफ यांची भूमिका असल्याचा संशय हबीब यांनी व्यक्त केला. यासाठी इस्रायली पेगेसस स्पायवेअरचा उपयोग झाला, असाही आरोप फारुख हबीब यांनी केला. ते फैसलाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

फारुख हबीब म्हणाले, “2018 च्या निवडणुकी आधी इम्रान खान विरोधी पक्षाचे प्रमुख नेता होते. त्यांनी त्यावेळी ‘पनामा पेपर्स’ प्रकरण आणि निवडणुकीत घोटाळा केल्या प्रकरणी नवाज शरीफ यांच्या विरोधात आक्रमक अभियान राबवलं होतं. त्यामुळेच पीएमएल-एन नेते इम्रान खान यांची हेरगिरी करण्यासाठी इस्राईलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्याच्या मदतीने खासगीपणाचा भंग करत शरीफ यांनी भारतासोबतच्या आपल्या संबंधांचा उपयोग केला.

 

पाकिस्तानचे मंत्री हबीब म्हणाले, “नवाज शरीफ यांनी पाकिस्तान आणि ‘काश्मीरी लोकांच्या’ शत्रुकडून मदत घेत विरोधकांचे फोन टॅप केले. मोदी आपल्या विरोधकांच्या खासगीपणावर हल्ला करत होते तेव्हा शरीफ यांनी देखील त्यांच्या मदतीने इम्रान खान यांच्या फोनवरील माहिती चोरली. या प्रकरणी आम्ही नवाज शरीफ यांच्याकडून उत्तर मागू. त्यांनी याआधी देखील न्यायाधीश, राजकीय नेते, गुप्तचर संस्थांचे प्रमुख आणि राजकीय विरोधक यांच्याबाबत असं केलेलं आहे.”

 

इस्राईली स्पायवेअर ‘पेगेसस’च्या मदतीने जगभरातील अनेक लोकांचे फोन टॅप करण्यात आल्याचं अनेक माध्यमसंस्थांनी म्हटलंय. याबाबतचा संशोधन अहवाल रविवारी प्रकाशित झाल्यावर जगभर चर्चेला उधाण आलं. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील पत्रकार, सरकारी अधिकारी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे स्मार्टफोन हॅक करण्यासाठी इस्रायली कंपनीच्या स्पायवेअरचा उपयोग करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. याच रिपोर्टनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही एक फोन हॅक करण्यात आला होता.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!