शरद पवार – फडणवीस भेटीचा राजकीय अर्थ काढू नये — संजय राऊत

 

मुंबई : वृत्तसंस्था । पाच दिवसांपूर्वी मीदेखील शरद पवारांना भेटलो होतो. त्याआधी वर्षा बंगल्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती  शरद पवार – फडणवीस  भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

फडणवीसांनी सोमवारी ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं आहे. मात्र मराठा, ओबीसी आरक्षणासह अन्य राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

 

“फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आहेत. शरद पवार राज्यातील आणि देशातील मोठे नेते आहेत. ही एक सदिच्छा भेट होती, यामुळे राजकारण तापणार नाही. कोरोना संकटात विरोधी पक्षाने कशाप्रकारे भूमिका घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करण्याची गरज आहे यासंबंधी शरद पवरांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये होणार ना महाराष्ट्रात असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

 

“राज्याला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. शरद पवारही विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी उत्तम काम केलं होतं. त्यामुळे फडणवीस त्यांच्याकडे गेले असतील तर त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं असेल,” असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात आपली परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे राजकारणात आपण शत्रुत्व घेऊन बसत नाही. भेटीगाठी, चर्चा होत असते. त्यामुळे या भेटीकडे फार राजकीय हेतूनं पाहणं चुकीचं आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं असेल.

 

शरद पवारांनी सत्तेचा मंत्र दिला असेल का ? असं विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “सत्तेचा मंत्र नक्की दिला असेल. ज्याप्रकारे विरोधी पक्ष राज्यात गोंधळ निर्माण करत आहे, सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, हे सर्व असंच सुरु राहिलं तर पुढील १०० वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही हे नक्कीच शरद पवारांनी सांगितलं असेल”.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.