व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दुसऱ्या संशयिताला मुंबईतून अटक

जळगाव सायबर पोलीसांची कामगिरी; १६ लाखांची केली होती ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामास लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगून रावेरच्या एका व्यापाऱ्याची १६ लाखांत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात एक संशयित गजाआड होता. तर दुसऱ्या संशयितालाही सायबर पोलिसांनी मुंबई मधून रविवारी ७ मे रोजी रात्री ८ वाजता केली आहे.

अधिक माहिती अशी की, मोहनलाल देवजी पटेल (वय ६०, रा. गजानन नगर, रावेर) यांनी याबाबत जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती. मोहनलाल देवजी पटेल यांना संशयित ललितकुमार तुलसीराम खंडेलवाल (वय ३८, रा. छिपावली, ता. जि. सिरोही, राजस्थान) याने फोनवरून ‘आमची आयएसओ टॉप्स इंडिया मेटल ट्रेडर्स’ नावाची कंपनी आहे. आम्ही तुम्हाला बांधकामासाठी लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगून विश्वास संपादन केला. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान हा गुन्हा घडला होता. तसेच त्यांना टॅक्स इन्व्हॉईस व बनावट ई बिल पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख २७ हजार ८०० रुपये घेऊन त्यांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ मार्चला संशयित ललितकुमार खंडेलवाल याला सायबर पोलिसांनी सुरतमधून अटक केली.

सदर प्रकरणात दुसरा संशयित आरोपी मोहम्मद आफताब असगर अली (४३, साकीनाका, मुंबई) हा निष्पन्न झाला होता. त्यानुसार त्याचा शोध सुरु होता. त्याची माहिती मिळाल्यावर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी ७ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याला मुंबई येथून अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर त्याची कसून तपासणी केली जात आहे. सदर संशयित आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस कर्मचारी श्रीकांत चव्हाण, वसंत बेलदार, ललित नारखेडे आदींनी सहभाग घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content