वुहानच्या प्रयोगशाळेला अमेरिकेतून वित्तपुरवठा !

 

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था | आता अमेरिकेच्या फेडरल डेटामधून माहिती आली आहे की  वुहान प्रयोगशाळेला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने निधी दिलेल्या संस्थेकडून वित्तपुरवठा होत होता

 

जगभरात कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या उगमस्थानाबाबत अनेक दावे करण्यात येत आहेत.   दुसरीकडे चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळा पु्न्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोनाची चौकशी पूर्ण करण्यासाठी तपास यंत्रणांना मुदत दिली आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेने चीनला क्लिन चीट दिली होती. त्यानंतरही वुहान प्रयोगशाळेवर संशय व्यक्त केला जात आहे. या संशयाच्या वातावरणात अमेरिकेच्या फेडरल डेटाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने ब्रिटीश वंशाचे डॉ. पीटर दासजक यांच्या संस्थेला तीन अब्ज रुपयांची आर्थिक मदत केली होती. डॉक्टर पीटर दासजक इकोहेल्थ अलायन्सच्या नावे एक संस्था चालवतात आणि याच संस्थेने चीनच्या वुहान प्रयोगशाळेला आर्थिक मदत केली असल्याचे समोर आले आहे.

 

ही बाब समोर आल्यानंतर इकोहेल्थ अलायन्स संस्थादेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. इकोहेल्थ अलायन्स संस्था ही अमेरिकेतील अशासकीय संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून नवीन आजारांवर संशोधन करण्यात येते. या संस्थेने वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीला दिलेल्या निधीतून कोरोनावर संशोधन करण्यात आले का, याचाही तपास करण्यात येणार आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.