वीज कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीत

 

मुंबई : वृत्तसंस्था । वीज कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलं आहे.  दीड वर्षापासून राज्यात कोरोनाचं संकट थैमान घालत आहे.

 

या काळात अनेक सामाजिक संस्था, खासगी क्षेत्रातील कंपन्या आणि वैयक्तिक पातळीवर लाखो लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील वीज विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीही मागे राहिलेले नाहीत. राज्यातील महावितरण आणि महाऊर्जा या वीज वितरण कंपन्यांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे. या रकमेचा धनादेश आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनाचा मिळून हा निधी ६ कोटी २० लाखांच्या घरात गेला आहे

 

सह्याद्री अतिथिगृहात हा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला. यात महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून पाच कोटी १७ लाख ३४ हजार ६५० रुपये तर महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनातून १ कोटी २ लाख ७१ हजार रुपयांचे योगदान एकत्रित करण्यात आले. हे योगदान धनादेशाच्या रुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आले आहे. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महावितरण आणि महानिर्मितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची या योगदानाबद्दल प्रशंसा केली. “कोविड-१९ च्या संकटात हे सर्व अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा अखंडीत रहावा यासाठी आव्हानात्मक परिस्थितीतही सदैव सज्ज राहिले आहेत. यातूनही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याची संवेदनशीलता दाखविली आहे, जी कौतुकास्पद आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.