विशेष मोहिमेत पाणपोईसह ३९ अतिक्रमण जमीनदोस्त (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेल्या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असून पहिल्या दिवशी ३९ अतिक्रमण काढण्यात आली आहेत.

 

शहरातील सहा रस्ते मनपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मनपा प्रशासनाला या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होवून कार्यादेश देखील देण्यात आले असून या रस्त्यांच्या कामांना आठवड्याभरात सुरुवात करण्यात येणार आहे.याच पार्श्वभूमीवर महापौर जयश्री महाजन यांनी देखील या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत सूचित केले होते. आज महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने शहर पोलीस स्टेशन ते भिलपुरा पोलीस चौकीपर्यंतच्या डाव्या बाजूचे ३९ अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. यात पाणपोई, दुकानांचे पक्के ओटे, पायऱ्या तसेच रस्त्यावरील फलक आदींचा समावेश होता. तर उद्या उजव्या बाजूकडील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. दरम्यान, अतिक्रमण काढत असतांना दुकानदार व अतिक्रमण निर्मुलन पथकात काही ठिकाणी वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकारवाईसाठी शनिपेठ पोलिसांकडे पत्राद्वारे मागणीसाठी केली होती. परंतु, पोलीस बंदोबस्त मिळाला नव्हता. उपयुक्त श्याम गोसावी, अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख, नगररचना विभागाचे प्रसाद पुराणिक, बांधकाम विभागाचे मनीष अमृतकर, सुभाष मराठे, संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे, जमील शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

भाग १

भाग २

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.