जळगाव, प्रतिनिधी |आजच्या महापालिकेच्या ऑनलाईन विशेष महासभेत विविध विकास कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ही सभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडली. याप्रसंगी मंचावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.
आजच्या विशेष सभेत शहरातील विकास कामांना मंजुरी मिळावी यासाठी आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज्य शासनाच्या ४२ कोटींच्या निधीतील कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ४३ कोटींच्या कामांच्या प्रस्ताव मंजूर होवून कार्यादेश देण्यासाठी सभेपुढे आले असता त्यांना देखील सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शहरातील विकास कामांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहराचा विकास नजरेसमोर ठेवून सर्वानुमते मंजुरी दिल्याने महापौर जयश्री महाजन यांनी सर्वांचे आभार मानले. महापौर जयश्री महाजन यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, आजच्या विशेष महासभेत ८५ कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यात प्रामुख्याने ४२ कोटींच्या निधीतून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे कामांना मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे जळगाव शहरातील रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. ४३ कोटींच्या कामांत काही अपवाद वगळता सर्व रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे. वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात नक्कीच मदत होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अॅड. शुचिता हाडा यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना ४२ कोटींचा निधी महापालिकेला देण्यात आला होता. हा निधी मध्यंतरीच्या काळात स्थगितीच्या फेऱ्यात अडकला होता. दरम्यान, अॅड. हाडा ह्या स्थायी समिती सभापती असतांना शासन दरबारी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच या निधीसाठी त्यांनी उच्च न्यायालाचे दरवाजे देखील ठोठावल्याचे हे फलित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्या, पुढे म्हणाल्या की, आ. गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे यांनी पाठपुरावा केल्याने ४२ कोटींची स्थगिती उठून मार्ग मोकळा झाला आहे. भाजप विकास कामांना नेहमीच अग्रक्रम देत असल्यने भाजपने सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. त्रिसदस्यीय समितीमार्फेत ४२ कोटींच्या विकास कामांची यादी निश्चित करण्यात आली. मात्र, ५८ कोटीच्या विकास कामांची यादी तयार करतांना भारतीय जनता पार्टी पक्षाला विश्वासात घेण्यात यावे अशी अपेक्षाही अॅड. हाडा यांनी व्यक्त केली. सर्व नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सम-समान कामे या विषयी उपसूचना देखील अॅड. हाडा यांनी मांडली आहे.
दरम्यान, विशेष महासभेत स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी ५८ कोटींच्या विकास कामांमध्ये मेहरूण स्मशान भूमी विकसित करण्यासाठी तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली. महापौर यांच्यासाठी जळगाव शहरात महापालिकेच्या निवासस्थानात पैकी एक निवास्थान देण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे जेष्ठ सदस्य नितीन लढ्ढा व शिवसेना गटनेते अनंत जोशो यांनी सादर केला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तात्पुरत्या स्वरुपात हे निवासस्थान उपलब्ध करून कायम स्वरूपी निवासस्थानासाठी नवीन आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी केली. याप्रस्तावास भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी देखील पाठींबा दिला. या प्रस्तावाचे भाजपच्या अॅड. शुचिता हाडा यांनी स्वागत करत पुढील काळात हा भाजपच्या महापौरांना देखील उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
विषय पत्रिकेवरील समान विषय एकसाथ मंजूर करण्यात यावेत अशी सूचना जेष्ठ सदस्य कैलास सोनवणे यांनी मांडली असता महापौर यांनी सर्व विषय वाचून दाखवले जातील अशी भूमिका स्पष्ट केली. आयुक्तांनी सभेच्या कामकाजाच्या नियमानुसार सर्व विषय वाचणे गरजचे असल्याचे सभागृहास अवगत केले. यानंतर नगरसचिव यांनी सर्व विषय वाचून दाखवले. अजेंडावरील सर्व २५ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. भाजपाच्या उज्वला बेंडाळे यांनी त्यांच्या प्रभागातील चर्च ते सुरेशदादा जैन चाळ हा रस्ता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या त्रिस्तरीय समितीत आयुक्तांनी नामंजूर केल्याचा आरोप केला. आयुक्तांनी हे कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आयुक्त कुलकर्णी यांनी हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, समितीला मर्यादित निधीत काम करावयाचे होते. तसेच समितीने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत ५८ कोटींच्या निधीत पुन्हा प्राथमिकता लक्षात घेऊन नियोजन करण्यात येईल असी ग्वाही दिली.