जळगाव, प्रतिनिधी । आज ई-मेल व ट्विटरद्वारे जळगाव जिल्हा एनएसयूआय यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी महाराष्ट्र राज्यामधील शाळा व महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांची येणाऱ्या शैक्षणिक वर्षाची(२०२०- २०२१) फी संपूर्णपणे माफ करावी, अशी मागणी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे तसेच शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड व उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे केली.
एनएसयुआय जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी ई-मेल व ट्विटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण देशात व प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना संसर्गामुळे अतिगंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर दिनांक २३ मार्च पासून संपूर्ण लॉक डाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. त्याआधी खबरदारी म्हणून १५ मार्चपासून संपूर्ण राज्यातील शाळा व महाविद्यालय बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, राज्यावर अचानक संकट आल्यामुळे संचारबंदी लागू करावी लागल्याने सर्व उद्योगधंदे, शेती व्यवसाय व शेतकरी, नोकरदार, व हातमजुर अशा सर्व वर्गांना याचा चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक पालक हे खाजगी कंपनीत कामाला आहेत. या कंपन्या नोकरदारांना बंद असल्यामुळे बंद काळातील पगार देतील की नाही ? यात शंका आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता बंद काळात घर चालवतांना लागणारी कसरत पाहता जळगाव जिल्हा एन एस यु आय कडून शासनाला विनंती की, राज्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित इंग्रजी (बोर्ड व सीबीएससी पॅटर्न ),मराठी शाळा व महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांची आगामी शैक्षणिक वर्षाची(२०२०-२०२१) संपूर्ण फी माफ करावी व विद्यार्थी व पालकांना सहकार्य करावे अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना करण्यात आली आहे.