विद्यापीठात संधोधनातील नावीन्यतेचा “आविष्कार” 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संशोधनाकडे विद्यार्थी वळत नाहीत हा समज खोटा ठरवत जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन जिल्ह्यातील भावी संशोधकांनी विज्ञानापासून तर थेट शेती-माती आणि आरोग्य, सामाजिक प्रश्नांपर्यंतचे सखोल संशोधन पोस्टर्स व मोड्यूल्सव्दारे दाखवून खान्देश संशोधनात अग्रेसर असल्याचा संदेश आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आविष्कार संशोधन स्पर्धेत दिला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेला शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, स्पर्धेचे समन्वयक प्रा.एस.आर.कोल्हे, प्रा. जे. व्ही. साळी, प्रा.सुनील कुलकर्णी यांची मंचावर उपस्थिती होती.

४४५ विद्यार्थ्यांचे २८८ पोस्टर्स व मॉडेल्स या स्पर्धेत मांडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन, वाणिज्य व व्यवस्थापन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामाजिकशास्त्र, फार्मसी आदी विषयांमधील पोस्टर व मोड्युल्सची मांडणी सभागृहात केली होती. पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या गटातील स्पर्धक मोठया उत्साहाने आपले संशोधन सादर करीत होते. त्यांच्या या संशोधनात नावीन्यता तर होतीच मात्र भविष्यातील मोठया संशोधनाची बीजे देखील दिसून येत होती.

या स्पर्धेत फ्लाईंग बलून फॉर सोसायटी, ॲग्रीकल्चर ॲण्ड ऑईल कंटीमिनीटेड टेम्पल साईटस, स्मार्ट स्टीक फॉर डिसएबल पर्सन, फिटनेस ट्रॅकर, फ्रुट ज्युस युझींग रिसायकलेबल, प्री पेच्युअल मोशन मशीन, प्लास्टीक रिमोडेलिंग, ऑटो फार्मर, जिओ पार्क, ऑटोमॅटीक गॅस लिकेज डिक्टेटर, लेझर सिक्युरिटी डोअर, ॲक्वा पोनीक्स फार्मींग, इकोफ्रेन्डली किटकनाशके, व्हर्टीकल फार्मिंग, प्रदुषणावर उपाय, बॅक्टेरियांचा सुयोग्य वापर, पर्यावरण शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संगणकाचा तंत्रज्ञानात वापर, नैसर्गिक द्रव्यांपासून पॉलिमर रेझिन, सायबर सुरक्षितता, शेतीतील कचऱ्यापासून इंधननिर्मीती, आधुनिक शेती, बायो इथॉनॉल, आधार मतदान कार्डाशी जोडणीची परिणामकारता, आपले सरकार, आत्महत्या, लहान राज्याची मागणी, बेरोजगारी, मोबाईलचा वापर, महाराष्ट्रातील लोककला, प्लाझ्मा, थर्मल प्रोसेस, सोलर सेल, प्लास्टीक कचऱ्यापासून इंधन निर्मिती, योगा आदी विषयांवर पोस्टर व मॉड्युल्सव्दारे संशोधनाचे निष्कर्ष विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी अमन मित्तल म्हणाले की, सध्याचे युग हे संशोधनातील नवनवीन आविष्कार आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे असून या विद्यार्थीदशेत केलेले संशोधन हे पुढील आयुष्यात दिशादर्शक ठरणारे आहे. केवळ स्पर्धेपुरते संशोधनाकडे बघू नका. संशोधनातून समाजाला विकासाच्या मार्गावर नेता येते. आपल्या अवतीभवतीच्या समस्या आणि त्यावरील उपाय शोधा असे सांगतांना श्री.मित्तल यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव देखील सांगितले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी यापुढच्या काळात सर्जनशीलता आणि नाविन्य यांना खूप महत्व राहणार असून विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीकोनातून विचार करायला हवा असे आवाहन केले. प्रास्ताविकात समन्वयक प्रा. एस.आर. कोल्हे यांनी स्पर्धेची माहिती दिली. प्रा.जी.ए.उस्मानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा.जे.व्ही.साळी यांनी आभार मानले. उद्या शनिवार दि.१२ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा समारोप उद्योजक निलेश तेली व आर.वाय.चौधरी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ४ वाजता होणार आहे. त्या आधी सकाळी पुढील फेरीसाठी निवडलेल्या स्पर्धकांचे सादरीकरण होईल.

Protected Content