विद्यापीठात रासेयो पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिराचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते करण्यात आले.

प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार अध्यक्षस्थानी होते. या शिबिरात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगना, गुजरात, दमन, दादरा-नगरहवेली, गोवा या सात राज्यांमधील १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थ्यांनी असे २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

डॉ.राऊत आपल्या भाषणात म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात परीक्षा आणि पदवी इतकेच अवांतर उपक्रमातील सहभाग महत्वाचा असून यातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व उजळून निघत असते.  देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त हे शिबिर घेतले जात असल्यामुळे वेगळे महत्व आहे. केवळ परीक्षा आणि पदवी यांना महत्व न देता सांस्कृतीक व सामाजिक उपक्रमातील सहभागही महाविद्यालयीन जीवनात महत्वाचा असतो. आयुष्यात पुढे संर्घष करतांना या आठवणी बळ देत असतात. या शिबिरात कोविड सुचनांचे पालन केले जाऊन शिबिराचा आनंद घ्या अशी सूचना त्यांनी केली.

अध्यक्षीय भाषणात प्रा.बी.व्ही. पवार यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांवर रासेयोचे सामाजिक काम जोमात सुरू असून यातून सामाजिक बांधिलकीचे संस्कार विद्यार्थ्यांवर होतात असे मत व्यक्त केले. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी बुध्दी आणि कौशल्य या बळावर देशातील तरूणाई जगाचे नेतृत्व करण्यास कटीबध्द  असल्याचे कोविड काळात दिसून आले. असे आपल्या भाषणात सांगीतले. राज्याचे रासेयो विशेष कार्यअधिकारी प्रभाकर देसाई यांनी कोविड काळात देशभर रासेयोने भरीव कामगिरी केल्याचे सांगीतले. रासेयोचे पुणे विभागीय संचालक डी.कार्तिकेयन यांनी १० दिवसाच्या या शिबिराची रूपरेषा सांगताना कोविडच्या नियमांचे पालन केले जाईल अशी ग्वाही दिली. विद्यापीठाचे रासेयो संचालक आणि या शिब‍िराचे समन्वयक डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी प्रास्ताविकात रासेयोच्या विविध घोषणा देत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य आर.पी.फालक, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.किशोर पवार, रासेयोचे विभागीय युवा अधिकारी श्री.अजय शिंदे, अधिसभा सदस्य अमोल मराठे, मनिषा खडके, प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, जिल्हा समन्वयक डॉ.मनीष करंजे, डॉ. सचिन नांद्रे, डॉ.विजय पाटील, आदी उपस्थिती होते.

यावेळी शोभायात्रा काढण्यात आली. यात महाराष्ट्राच्या संघाने लेझीम, गुजरात संघाने गरबा, तेलंगणा संघाने पोतराज, आंध्रा संघाने लोकनृत्य आणि दमण संघाने पोर्तुगिज नृत्य सादर केले. दिड वर्षाच्या कालावधी नंतर विद्यापीठाचा परिसर या शोभायात्रेमुळे रोमांचित झाला होता. विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात उदघाटनाच्या आधी भारताच्या नकाशाच्या आकारात सर्व संघ उभे होते व या सातही संघांनी आपआपल्या सांस्कृतिक नृत्यांनी ओळख करून दिली.

या शिबिरासाठी भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने सहकार्य केलेले आहे. शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांचा १० दिवस पथसंचलनाचा सराव घेतला जाईल यासोबतच समूह उपक्रम, सांस्कृतिक आदी कार्यक्रम देखील होणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत कसबे यांनी केले. आभार डॉ. सचिन नांद्रे यांनी मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!