जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या दहा सदस्यांसाठी रविवार दि. २९ जानेवारी, २०२३ रोजी मतदान होत असून शनिवारी विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले. या निवडणूकीसाठी विद्यापीठ प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
रविवारी जळगाव, धुळे व नंदुरबार या तिनही जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रावरील ६० बुथवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान होणार आहे. एकूण २२ हजार ६६३ मतदारांची नोंदणी झालेली आहे. शनिवारी सकाळी या तिनही जिल्हयातील मतदान केंद्राकडे अधिकारी, कर्मचारी हे मतदान साहित्यासह वाहनाने रवाना झाले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी या वाहनांना झेंडी दाखविली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील, निवडणूक विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील, डॉ. मुनाफ शेख, निवडणूक विभागीय अधिकारी सीए रवींद्र पाटील, प्रा.अनिल डोंगरे, डॉ. दीपक दलाल, डॉ. सचिन नांद्रे, प्रा. के.एफ. पवार, प्रा. राम भावसार, प्रा. आशुतोष पाटील, डॉ. दिनेश पाटील, प्रा. अजय सुरवाडे. निवडणूक क्षेत्रीय अधिकारी ए.सी. मनोरे, जी.एन. पवार, एस.आर.गोहिल, इंजि. एस.आर. पाटील, व्ही.व्ही. तळेले., के.सी. पाटील, कपिल गिरी, मनोज निळे आदी उपस्थित होते.
मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी ९ विभागीय अधिकारी, ८ क्षेत्रीय अधिकारी, ६० केंद्राध्यक्ष, आणि जवळपास ३७० मतदान अधिकारी व मतदान सेवक अशा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. १० जागांसाठी २७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. खुल्या संवर्गात ५ जागांसाठी ११ उमेदवार, इतर मागास संवर्गात १ जागेसाठी ३ उमेदवार, अनुसूचित जाती संवर्गात १ जागेसाठी ४ उमेदवार, अनुसूचित जमाती संवर्गात १ जागेसाठी २ उमेदवार, विमुक्त जाती / भटक्या जाती संवर्गात १ जागेसाठी ३ उमेदवार तर महिला संवर्गात १ जागेसाठी ४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.