जळगाव, प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘पुस्तक पेढी’ योजनेचे उदघाटन विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थ्याला पुस्तके देऊन करण्यात आले.
‘पुस्तक पेढी’ योजनेच्या उद्घाटनप्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठानचे सहसचिव विनोद पाटील, व्यवस्थापन अधिकारी दिनेश ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. किशोर पाठक, उमेश इंगळे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रासाठी लागणारी सर्व क्रमिक पुस्तके वर्षभरासाठी उपलब्ध करण्यात येईल. अधिकाधिक पुस्तके आणि उत्तम ग्रंथालयीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा हा एक अभिनव प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस अशा योजनांचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास सर्व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. योजनेसाठी महाविद्यालयास एक लाख पेक्षा जास्त रकमेच्या पुस्तकांचे अनुदान प्राप्त झाले आहे. यांसाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. हितेश ब्रिजवासी यांनी प्रयत्न केले तर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे व सहसचिव विनोद पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.