रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील रेशनदुकानदार धान्य जादा दराने आणि प्रमाणापेक्षा कमी देत असल्याच्या तक्रारीनुसार आज चौकशी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी रेशनदुकानाचा परवाना आज रद्द केला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील रेशन दुकानदार के.एस. शिंदे याने रेशनदुकानातून धान्याची जादा दराने व ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी वाटप केल्याच्या कारणावरून प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार उषारणी देवगुणे यांनी स्थानिक नागरिकांचे जबाब घेऊन चौकशी केली असता त्यात तथ्य असल्याचे दिसून आले. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी याबाबत तडकाफडकी निर्णय घेत या दुकानाचा परवाना तत्काळ रद्द केला असून दुकानदार वसंत गणपत शिंदे यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग अधिनियम, जीवनावश्यक वस्तू अधिनियम नुसार सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.