वरखेडीजवळ ट्रकची दुचाकीस धडक : दुचाकीस्वार जागीच ठार

पाचोरा, , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरखेडी जवळील सरकारी दवाखान्यासमोर ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपळगाव हरेश्वरकडून मोसंबीने भरलेला ट्रक क्रमांक एच. पी. १७ यु. ७२८५ हा ट्रकचालक महेंदरसिंग रघुवीरसिंग हा पाचोराकडे दुपारी १ वाजून ३० वाजेच्या सुमारास घेऊन जात असतांना याचवेळी वरखेडी बसस्थानकाकडून वरसाडे येथील रहिवासी व ग्राम विकास मंडळाचे माजी संचालक पिंपळगाव (हरेश्वर) तथा वरसाड्या तांड्याचे नाईक भंगलाल गोविंदा राठोड हे आपल्या एम. एच.२० ए. जे. ५००० क्रमांकाच्या दुचाकीवरून पिंपळगाव हरेश्वरकडे जात असतांनाच वरखेडी येथील शासकीय रुग्णालयासमोर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यामुळे दुचाकीस्वार भंगलाल राठोड हे जागीच ठार झाले. ही घटना घडताच वरखेडी येथील ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश चौधरी, शशिकांत पाटील (राजुरी), दिनेश पाटील (शिंदाड), गोरख जाधव, समाधान भोई यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणण्यात आली, परंतु तोपर्यंत दुचाकीस्वार भंगलाल राठोड यांची प्राणज्योत मालवली होती. अपघाताची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील व सहकाऱ्यांना पाठवून अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाचा मृतदेह पाचोरा नगरपालिकेच्या दवाखान्यात पाठवून अपघातग्रस्त ट्रक व चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस करत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!