मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन पूर्णपणे उठविण्याला साफ नकार देतांना परिस्थितीनुसार क्रमाक्रमाने अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यात त्यांनी प्रारंभी निसर्ग चक्रीवादळाचा प्रशासनाने यशस्वीपणे सामना केल्याबद्दल कौतुक केले. यानंतर ते म्हणाले की, देशभरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन असून यापुढेही लागू राहणार का ? हा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. तथापि, ३० जूननंतर हा लॉकडाऊन सुरू राहणार असला तरी अनलॉक करण्याच्या दिशेने पावले पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात गत अनेक दिवसांपासून क्रमाक्रमाने विविध क्षेत्रांना परवानगी देण्यात येत असून आगामी काही दिवसांमध्ये परिस्थिती पाहून याच प्रमाणे शिथीलता देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, यंदाच्या आषाढी एकादशीला मी स्वत: जाणार असलो तरी यंदा येथे भाविकांची मांदियाळी नसेल. यानंतर गणेशोत्सव आणि नंतर बरेचसे सण येणार असले तरी यंदा मात्र यांना साजरे करतांना आपल्याला काही पथ्ये पाळावी लागणार आहेत. यात विशेष करून गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, हळूहळू जनजीवन पुर्वीप्रमाणे सुरू होणार असले तरी जिथे संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून आले, त्या परिसरात पूर्वीसारखा लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोरोना रुग्णावरील उपचारांना आपण कुठेही कमी पडत नसल्याचे सांगतांना जी जी औषधे यासाठी सुचवली जात आहेत ती उपलब्ध करून घेऊन रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपला महाराष्ट्र उपचारात जगाबरोबरीने उभा असल्याचे सांगतांना ते म्हणाले की प्लाझमा थेरपी ची सुरुवात महाराष्ट्रात मार्च -एप्रिलपासून सुरु करण्यात आली. १० पैकी ९ रुग्ण यामुळे बरे झाले तर ७ जण घरीही गेले. प्लाझमा थेरपी करणारे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, ॲण्टीबॉडिज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवाहन ही केले.
रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे आपण वापरतच आहोत. याचा पुरवठा सुरळित झाला की कुठेही तुटवडा पडू देणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय निमशासकीय रुग्णालयात ही औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न आहे.
https://www.facebook.com/watch/?v=213906363047654