जळगाव प्रतिनिधी । लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील चार भामट्यांनी १७ वर्षीय मुलास मारहाण करून मोबाईलस हिसकावून घेतला. तर अजून पैसे हवे म्हणून भामट्यांनी मुलाला बँकेत नेले. पासबुकवर एंट्री मारल्यानंतर पैसे नसल्याचे पाहून चारही भामटे बँकेतून पसार झाल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी तहसील कार्यालयाजवळ घडली. तरूणाच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नितीन ज्ञानेश्वर बाविस्कर (वय १७, रा. कृष्णाजीनगर, अडावद, ता. चोपडा) असे तरुणाचे नाव आहे. नितीन हा शुक्रवारी दुपारी एसटी बसने जळगावात आला. शिवाजीनगरात उतरल्यानंतर रेल्वेरुळ ओलांडुन तो तहसिल कार्यालयाजवळ आला होता. तेथे त्याने दुचाकीस्वार भामट्यास बसस्थानकाचा पत्ता विचारला. पत्ता न सांगता भामट्याने नितीनला लिफ्ट दिली. परंतु, त्याला बसस्थानकात न घेऊन जाता एका अज्ञात स्थळी नेले. तेथे भामट्याचे आणखी तीन साथीदार हजर होते. या चौघांनी नितीनला मारहाण करुन त्याच्या जवळील १० हजार रुपयांचा मोबाईल व पाचशे रुपये काढुन घेतले. भामट्यांनी आणखी काही आहे का? याची तपासणी केली असता नितीनच्या बॅगेतून स्टेट बँकेचे पासबुक मिळुन आले.
बँकेत किती रक्कम आहे याचीही विचारणा केली. परंतु, खात्यात पैसे नसल्याचे नितीनने सांगीतले. यानंतर भामट्यांनी पुन्हा नितीनला दुचाकीवर बसवून स्टेडीयम समोरील स्टेट बँकेत आणले. तेथे रितसर नितीनच्या पासबुकची एन्ट्रीकरुन बँलेन्स चेक करुन घेतला. खात्यात पैसे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चारही भामट्यांनी बँकेतून पळ काढला. तत्पूर्वी त्यांनी नितीनला पोलिसांत न जाण्याची धमकीही दिली. भामटे पळुन गेल्यानंतर नितीनने शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ विजय निकुंभ तपास करीत आहेत.