नवी दिल्ली: वृत्तसंस्था । काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू असताना, दुसरीकडे काँग्रेसने तीन नव्या समित्यांचे गठन केले आहे. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या तीन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समित्यांमध्ये माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना स्थान नाही.
ज्येष्ठ नेत्यांना या समित्यांमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. आर्थिक, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काँग्रेस पक्षाने या तीन समित्या तयार केल्या आहेत. या तीन समित्यांमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. पक्षात बंडखोरीचा सूर आळवला जात असताना या समित्यांमध्ये गुलामनबी आझाद, आनंद शर्मा आणि शशी थरूर यांनाही स्थान देण्यात आले आहे.
काँग्रेसच्या २३ नेत्यांमध्ये या तीन नेत्याचा समावेश होता. या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. काँग्रेसच्या या २३ नेत्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा या मागणीसाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते.
आर्थिक मुद्द्यांशी संबंधित समितीत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समितीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांचा समावेश करण्यात आला आहे. परराष्ट्र व्यवहार विषयाशी संबंधित समितीत माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांना संयोजक बनवण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षात बंडखोरीचे बिगुल वाजत असून सतत पक्षात पसरलेल्या संभ्रमाबाबत पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोनिया गांधी या सक्रिय तर आहेतच पण बंडखोरीबाबतच्या पत्रात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर काम देखील करत आहेत असा नेते आणि कार्यकर्त्यांना संदेश देणे हा या समित्या गठित करण्यामागचा उद्देश आहे.
पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे असा सल्ला पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनी दिला होता त्यानंतर पक्षाचे अंतर्गत मुद्दे प्रसारमाध्यमांमध्ये आणणे योग्य नसल्याचे अशोक गहलोत यांनी म्हटले होते. मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील सिब्बल यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.