राहुल गांधींच्या सर्व निवडणूक प्रचारसभा रद्द

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  । देशात कोरोनाचा कहर वाढत असताना व पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु असताना राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

 

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५००  बाधित आढळले असून राहुल गांधी यांनी सर्व राजकीय नेत्यांना अशा परिस्थितीत गर्दी करत प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार कऱण्याचं आवाहन केलं आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. पाचव्या टप्प्यात एकूण ७९.१८ टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर राहुल गांधी यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महत्वाचा निर्णय घेतला आहे.

 

राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा”.

 

 

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी वारंवार भाजपा नेत्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सभा घेण्यावरुन टीकास्र सोडलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात आली होती. मात्र यावेळी काँग्रेसचे नेतेही सभा घेत होते. दरम्यान राहुल गांधी यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर काँग्रेस नेत्यांकडून स्वागत करण्यात येत असून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.

 

. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत सहा हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. तिथे आणखी तीन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. त्यामुळे या रणधुमाळीनंतर राज्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची भीती आहे. महाराष्ट्रामध्ये दैनंदिन वाढ ६० हजारांच्या आसपास होत आहे. पश्चिम बंगालमध्ये इतकी रुग्णवाढ झाली तर राज्यात हाहाकार माजण्याची भीती आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.