राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बियाणे होणार अनुदानावर वितरण

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- २०२१-२२ अन्नधान्य पिके व बियाणे लागवड उप अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम या दोन योजनेंतर्गत हरभरा, ज्वारी, मका, गहू बियाणे अनुदान तत्वावर वाटप होणार आहे.

रब्बी हंगामात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी-२०२ व बीडीएनजीके-७९८ या वाणांचे एकूण ६२९१ प्रमाणित बियाणे रक्कम रुपये २५०० प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. भरडधान्य योजनेंतर्गत ३५४ मका पिकासाठी ७५०/- रुपये प्रती किलो अनुदान तसेच रब्बी ज्वारी साठी रुपये ३० प्रती किलो १० वर्षे आतील वाणासाठी ४६० क्विंटल व ११० क्विंटल, १० वर्षे वरील वाणासाठी १५ रुपये प्रती किलो अनुदान तत्वावर बियाणे वितरण होणार आहे.

तसेच सन २०२१-२२ बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत १० वर्षावरील जॉकी -९२१८ या वाणाचे एकूण १२०० क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम रुपये २५००/- प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन आहे. ५३७३ क्विंटल इतका गहू रुपये १६००/- प्रति क्विंटल अनुदानाने वितरीत केला जाईल. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत लाभ देय आहे.

सदर अनुदान तत्वावर बियाणेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्यात यावा. अधिक माहितीसाठी जवळच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव व महाबीज यांचे अधिकृत वितरक यांच्याशी देखील संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!