रावेर प्रतिनिधी । रावेरात काल रात्री ८.३० वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत जखमी झालेल्या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीसांची धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेनंतर रावेर शहरात दोन दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यशवंत मराठे (वय-४५) रा. संभाजी नगर असे मयताचे नाव आहे. आज सकाळी जखमी झालेले यशवंत मराठे त्याच्या घरात तो मृतावस्थेत आढळला.
शिवाजी चौकात-मण्यार वाड्यातील जमावाने एकमेकांवर जोरदार दगडफेक करून भडकलेल्या जातीय दंगलीत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. तर पाच मोटार सायकली, एक मॅजिक यात जाळल्या असून, पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळत नसल्याने हवेत तीन गोळ्या झाडून जमावाला पांगवापांगव करण्यात आली होती. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दंगल होताच पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अंधारात पोलिसांना घटनास्थळ गाठण्यात विलंब झाला. पोलिसांनी तीन फैरी झाडल्यानंतर दंगल आटोक्यात आली.
रावेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. प्रार्थना स्थळावरून आलेल्या जमावाने शिवाजी चौकात जोरदार दगडफेक झाल्याने, दोन्ही बाजूने तुफान दगड गोटे एकमेकांवर भिरकवल्याने जोरदार दंगल भडकली. यात संतप्त जमावाने शिवाजी चौकातील व बारी वाड्यातील पाच मोटार सायकली एक टाटा मॅजिक जाळून भक्ष्य केल्या. रात्री १२ वाजता प्रांतअधिकारी यांनी ४८ तासासाठी संचार बंदी घोषित केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.