रावेर प्रतिनिधी । पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
आधीच कोरोनाचे सावट असतांना पावसाला सुरुवात होणार असून पावसाळ्यात होणार्या जोरदार पर्जन्यवृष्टीचा फटका नागरिकांना बसू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ उपाय योजना करता याव्यात या दृष्टिकोनातून येथील तहसील कार्यालयात पूर्वतयारीचा भाग म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख म्हणून तहसीलदार देवगुणे या आहेत.
अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक वेळा नद्या नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी काठावरील गावांमध्ये तसेच रहिवाशी वस्त्यांमध्ये घुसून परिस्थिती गंभीर होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ निवारणासाठी प्रशासनाने पूर्व तयारी केलेली आहे.
दरम्यान, तालुक्याला लागून असलेल्या तापी नदीच्या पुरामुळे तापी काठावरील अनेक गावांना धोका होण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारी म्हणून तालुक्यातील सर्व गावातील पट्टीच्या पोहणार्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. याशिवाय या नदीकाठावरील गावातील युवकांचे मदत पथक तयार करण्यात आलेले आहे. तर तालुक्यातील जेसीबी मालकांची यादी ही नाव व मोबाईल क्रमांकासह अद्ययावत करण्यात आली आहे.