राणा दाम्पत्याची आजची सुनावणी टळली

कामकाजाच्या व्यस्ततेमुळे उद्या होणार सुनावणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठन प्रकरणी राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती, ती टळली असून उद्या शनिवारी यावर निर्णय होणार आहे.

अमरावतीच्या खा. नवनीत राणा आणि आ. रवि राणा दाम्पत्य ‘मातोश्री’ समोर हनुमान चालीसा पठन करण्याच्या आग्रही भूमिकेमुळे यांचे पडसाद उमटले होते. तसेच प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वांद्रे पोलिसाकडून त्यांना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल असून महानगर दंडाधिकाऱ्यांतर्फे त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने खा, नवनीत राणा भायखळा जेलमध्ये तर आ.रवि राणा तळोजा कारागुहात आहेत.
दरम्यान, राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर न्यायालयाने जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. सध्या कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याने त्यांना घरचे जेवण मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला असून त्यांच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार होती. ती सुनावणी टळली आहे.

राणा दाम्पत्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आज सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे वकिलांनी केली होती. परंतु न्यायालयात कामकाजाच्या व्यस्ततेमुळे सुनावणी होणार नाही, आजच्या ऐवजी ती उद्या शनिवारी घेण्यात येईल असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितले, त्यामुळे राणा दाम्पत्याला जामिनासाठी अजून वाट पहावी लागणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!