जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था नाशिक” यांच्या वतीने योगेश पाटील अव्वल कारकून उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव यांना ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नगर येथील माऊली सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक, कवी फ.मु. शिंदे यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
आईच्या न्यायालयात सर्व गुन्हे माफ असतात. आईने दिलेल्या संस्काराची, ज्ञानाची शिदोरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडते. भारतीय संस्कृती महान आहे. तिचा वसा घेऊन आपण सर्वजण पुढे जात आहोत. आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वांनी केलेल्या कामामुळे भारत लवकरच विश्वगुरु होईल, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक, कवी फ.मु. शिंदे यांनी कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरीया होत्या. यावेळी संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नागेबाबा उद्योग समुहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, पुरुषोत्तम गड्डम व संभाजी पाटील उपस्थित होते.
नाशिक येथील शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था या राष्ट्रीय उपक्रमशिल संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक तथा राजकिय व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
या कार्यक्रमात निलेश लंके पारनेर आमदार विधानसभा, माणिक आहेर उपविभागीय अधिकारी वैजापूर, योगेश पाटील अव्वल कारकून उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव, डॉ. पीयुष पाटील प्राईम केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नगर, राहुल पवार उद्योजक तथा अध्यक्ष मराठा प्रिमियर लीग जळगाव, डॉ. मोसिम शेख मंडळ अधिकारी राहाता ता. नगर, साहेबराव मेंगडे संचालक अमृत फुड्सव हर्बल्स प्रा.लि., भानुदास मस्के सेवानिवृत्त नायब तहसीलदार संभाजीनगर यांचा राज्यस्तरीय शिवपुत्र पुरस्काराने व वीर पत्नी छाया उदार, रुपाली कदम, शीतल महाले लेखाधिकारी नियोजन विभाग औरंगाबाद यांचा राज्यस्तरीय शिवकन्या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
अव्वल कारकून योगेश पाटील हे प्रारंभी महसूल सहाय्यक पदावर रुजू झाले. त्यांना महसूल सहाय्यक पदावर असताना दोन वेळा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. मंडळ अधिकारी बोदवड पदावर कार्यरत असताना सन 2013-14 मध्ये जिल्हास्तरावरील पुरस्कार व सन 2015-16 मध्ये महाराजस्व अभियानामधील उल्लेखनीय कामकाजामुळे ‘उत्कृष्ट मंडळ अधिकारी’म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठीसुद्धा शिफारस करण्यात आली. तसेच अव्वल कारकून पदावर कार्यरत असताना तत्कालीन महसूल मंत्री मा. चंद्रकांतजी पाटील यांच्या हस्ते आपणास सन 2016-17 चा ‘उत्कृष्ट अव्वल कारकून’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जळगाव जिल्ह्याच्या 7/12 संगणकीकरणातील व जुन्या अभिलेख स्कॅनिंगच्या कामकाजाचा आलेख उंचावल्याने त्यांना सन 2017-18 मध्ये राज्यस्तरीय पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली. कोरोना संक्रमणातील काळात अडकलेल्या नागरीकांना दिलासा देण्यासाठी ई-प्रवास पासची जबाबदारी यशस्वी पार पाडल्याने त्या कार्याची पावती म्हणून गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री जळगाव यांनीही सन्मानित केले आहे.
याची दखल घेत नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार देऊन सन्माणित करण्यात आले. संस्थेच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवकन्या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांची संस्थेने दखल घेतली आहे. समाजकार्यातुन राष्ट्रउभारणीचा पाया उभा राहतो. त्यासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रास्ताविकात जगन्नाथ पाटील म्हणाले.