पाटणा : वृत्तसंस्था । सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्कारासाठी लायक नाही अशी टीका राजदचे खासदार शिवानंद तिवारी यांनी केली आहे
शेतकरी आंदोलनासंदर्भात पॉपस्टार सिंगर रिहानानं ट्विट केल्यानं नव्या चर्चेनं फैर धरला आहे. कला व क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी ट्विट करत अखंड भारताचा नारा लगावला होता. यात सचिन तेंडुलकरनंही ट्विट करत अप्रत्यक्षपणे रिहानावर टीका केली होती. त्यामुळे सचिनविरोधात रोष व्यक्त होताना दिसत आहेत.
सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर टीका करताना राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेतील माजी खासदार शिवानंद तिवारी यांनी सचिनला देण्यात आलेल्या भारतरत्नबद्दल भाष्य केलं आहे. शेतकरी गावात राहतात आणि त्यांना ट्विटरबद्दल माहिती नाही. तिथे काय लिहिलं जातं हे त्यांना माहिती नाही. दोन परदेशी व्यक्तींनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला की, लगेच सचिन तेंडुलकरने वादात उडी घेतली. तेंडुलकर अनेक उत्पादनांचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे आणि त्यामुळे तो भारतरत्नसाठी पात्र नाही. त्यापेक्षा मेजर ध्यानचंद यांच्यासारखे अनेकजण भारतरत्नसाठी पात्र असून, त्यांना मिळायला हवा,” असं म्हणत तिवारी यांनी टीका केली आहे.
तिवारी यांच्या विधानानंतर भाजपा व जदयूनं त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचे प्रवक्ते निखील आनंद यांनी तिवारी यांना सवाल केला आहे. “जर सचिन तेंडुलकर पात्र नाही, तर मग भारतरत्नसाठी कोण पात्र आहे? तिवारी यांना काय बोलावं हे कळत नाहीये. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे,” अशी टीका आनंद यांनी केली आहे.
जदयूचे प्रवक्ते निखील मंडल यांनीही तिवारी यांच्यावर निशाणा साधला आहे. “जर सचिन त्याने केलेल्या असामान्य पराक्रमासाठी भारतरत्नसाठी पात्र नाही, मग मैदानावर खेळाडूंसाठी पाण्याची बॉटल घेऊन जाणाऱ्याला द्यायला पाहिजे का? सचिननं विवेकी मतं मांडलं आहे. भारतीय त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत, यात काहीच चुकीचं नाही,” असं म्हणत मंडल यांनी तिवारींच्या विधानाला उत्तर दिलं आहे.
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असं ट्विट तेंडुलकरने म्हटलं होतं.