जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याच्या खून प्रकरणात एलसीबीने अटक केलेल्या लाडू गँगचा प्रमुखा संशयित आरोपीला शनिवारी सकाळी अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता २४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आकाश मुरलीधर सपकाळे (23,रा.कांचन नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री पाळधी, ता.धरणगाव येथून अटक केली होती. गुन्हा घडल्यापासून आकाश सपकाळे हा पोलिसांना चकवा देत होता. रोज गँगच्या इतर सहकार्यांकडून माहिती घेऊन तो राहण्याचे ठिकाण बदल करीत होता. शनिवारी सकाळी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याचे तपासअधिकारी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील सुनील पाटील, शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी अटक करण्यात आलेल्या आकाश यास रविवारी जिल्हा न्यायालयात हजर केले. त्यास न्यायालयाने 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आकाश सपकाळे यांच्या ताब्यातील लाकडी दांड्याने मारहाण केली होती, तो लाकडी दांडा त्याच्याकडून हस्तगत करण्यात येणार आहे.
घटनेची पार्श्वभूमी
राकेश याचा 4 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. त्यात गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर या चार जणांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, अधिकच्या चौकशीत आकाश हा देखील गुन्ह्यात निष्पन्न झाला होता. पोलिसांनी त्याला पाचव्या क्रमांकाचा आरोपी केला आहे.