लखनऊ : वृत्तसंस्था । ‘योगीजी तुम्हीही एका महिलेच्या पोटातून जन्म घेतलाय. तुम्हाला इतरांच्या बहिणी-मुलींना आपली बहिण-मुलगी समजायला हवं. तुम्ही त्यांचं संरक्षणकरू शकत नाही तर तुम्ही या पदापासून स्वत:च दूर व्हायला हवं. तुम्ही स्वत:च राजीनामा द्यायला हवा. माझा ९९ टक्के नाही तर १०० टक्के हा विश्वास आहे की सध्याचे उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. केंद्र सरकारनं नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथं राष्ट्रपती शासन लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा’ असं मायावती यांनी म्हटलंय.
उत्तर प्रदेशातील क्रूर आणि भयंकर गुन्ह्यांत दिवसेंदिवस भर पडत चालल्याचं दिसून येतंय. हाथरस सामूहिक बलात्काराच्या धक्कादायक प्रकारानंतर आता बलरामपूरमध्येही २२ वर्षांच्या एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचाही मृत्यू झालाय. यानंतर राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारला जबाबदार धरलंय.
‘हाथरस घटनेनंतर मला अशी आशा होती की दोषींवर उत्तर प्रदेश सरकार कारवाई करण्यासाठी पुढे येईल. पोरीबाळींना आपल्या वासनेचं शिकार ठरवणाऱ्यांवर नियंत्रण आणेल. परंतु असं काहीही झालेलं नाही. आज सकाळी मी बलरामपूरची आणखी एक घटना बातम्यांत पाहिली ज्यानं मला हादरवून टाकलं’ असंही मायावती यांनी म्हटलंय.
‘महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा. मी केंद्र सरकारला आग्रह करते की त्यांना त्यांच्या योग्य स्थानी धाडण्यात यावं – गोरखनाथ मठ. मंदिर पसंत नसेल तर त्यांना राम मंदिर निर्माणाचं कार्य देण्यात यावं’ असा टोलाही मायावती यांनी योगी आदित्यनाथांच्या माध्यमातून केंद्र सरकारला लगावलाय.
उत्तर प्रदेशात कायदे-व्यवस्थेनंही अखेरचा श्वास घेतलाय. खास करून या सरकारच्या राज्यात बहिणी-मुली अजिबात सुरक्षित नाहीत. भाजप सरकारमध्ये राज्यात केवळ गुंड, बदमाश, माफिया आणि बलात्काऱ्यांचं राज्य सुरू आहे, असा हल्लाबोल मायावती यांनी केलाय.