यावल, अय्युब पटेल । यावल शहरात नगराध्यक्ष व काही नगरसेवकांच्या एका गटाकडून विकास कामांचे श्रेय घेण्याच्या वादात विस्तारित क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने सर्वांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे.
यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील विस्तारीत भागातील आयशा नगर, फालक नगर , पांडुरंग सराफ नगर , गंगानगर आदी क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट झाली आहे. पाऊसांच्या पाण्यामुळे खोदलेल्या रस्त्यांवर मोठमोठी खड्डे निर्माण होवुन चिखलमय वातावरण निर्माण झाले असल्याने वाहनधारकांपासुन तर पादचाऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. या रसत्याची दुरुस्ती व्हावी याकरीता शहरातील काही तरुणांनी उपोषण देखील केले होते. यावल नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष तथा विकास निधी मंजुर करून आणणारे दुसरा गट असून, या नगर परिषदेतील गटातटाच्या राजकारणामुळे या भागातील रस्त्यांच्या कामांना विलंब झाला असल्याची प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीक व्यक्त करू लागले आहे. विकास कामांचे श्रेय कुणी घ्यावे या श्रेयवादाच्या गोंधळाचा त्रास शहरातील सर्वसामान्याना भोगावा लागत आहे. दरम्यान यावल नगर परिषदेतील नगराध्यक्ष आणि दुसरा एक विकास कामे करणारा गट हे एकत्र नसल्याचे सिद्ध झाले आहे. श्रेयवाद आणि वर्चस्वाच्या गोंधळात मात्र विस्तारीत क्षेत्रातील रस्ते विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. विस्तारीत वसाहतील नागरीकांना रस्त्यांच्या दुरुस्ती करिता मात्र हा गोंधळ संपण्याची वाट बघावी लागेल की काय असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/143469347910950