भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील मरीमाता मंदिराच्या मागील शौचालयला लागून तीन दुकानाचे अवैध बांधकाम सुरू असल्याबाबतची तक्रार भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना मोबाईलवर तक्रार आल्याने त्या तक्रारीची दखल घेत तीन दुकानावर हातोडा चालवून जमीनदोस्त केल्याची घटना दुपारी २.०० वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, मरीमाता मंदिराच्या मागील बाजूस बागवान गल्लीत कित्येक वर्षांपासून व्यापाऱ्यांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलेले आहेत. ते शौचालय जीर्ण झाल्याने त्यातील काही भाग जमीनदोस्त झालेला होता. व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेने नवीन शौचालय उभारलेले होते. त्या पुढील जागा ही रिकामी पडलेली होती. याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी विना परवानगी तीन दुकानाचे बांधकाम करण्यात आले असून दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू करण्यात आलेले होते. याबाबत तक्रारदाराने भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार याना मोबाईलवरून तक्रार केली व त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत बांधकाम विभाग, इंजिनियरिंग विभाग,कर विभाग, टाऊन प्लनिंग विभाग यांच्याकडे बांधकाम सुरू असल्याबाबत चौकशी केली असता असे कुठलेही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे निर्दशनास आल्याने मुख्याधिकारी यांनी शहरात अवैध बांधकाम करण्यासाठी पथक तयार करण्यात आलेले आहे. हे पथक शहरात कुठे विना परवानगी बांधकाम सुरू आहे याचा तपास करून स्लॅप टाकल्यानंतर त्या बांधकामास जमीनदोस्त करणार आहे. याचा शुभारंभ मुख्याधिकारी यांनी तीन दुकाने तोडून केलेला आहे.
त्याचप्रमाणे शहरात कुठे दुकाने बांधकाम करणे सुरू असल्यास जे कोणी ते विक्रीसाठी आले तर त्या जागेची आधी कागदपत्रांची पळताळणी करा व त्यानंतर खरेदी करा असे विना परवानगी बांधकाम असल्यास त्याला नक्की तोडण्यात येणार असून व्यापाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आमिषाला बळी पडू नका असे मुख्याधिकारी यांनी आवाहन केले आहे.
नाल्याच्या वॉल कंपाऊंडवर कॉलम घेऊन मरीमाता मंदिराच्या मागे तीन दुकाने उभारण्यात आलेली होती. त्या दुकानांना आजरोजी नगरपरिषदेने जमीनदोस्त करण्याचे काम सुरू होते. यादरम्यान बांधकाम करणारे एकही व्यक्ती गुन्हा दाखल होण्याच्या धाकाने समोर आलेला नाही. पण दबक्या आवाजात नगरपरिषदेचे सत्ताधारी पक्षाचे दोन नगरसेवकांचे बांधकाम असल्याची चर्चा सुरू होती.