मोदींच्या तुलनेत पंतप्रधान म्हणून गडकरींना महाराष्ट्राची पसंती

 

मुंबई : वृत्तसंस्था । पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी हे मोदींपेक्षा उत्तम पर्याय असतील असं महाराष्ट्रातील जनतेला वाटत. लोकसत्ता डॉटकॉमच्या सर्वेक्षणामध्ये साडेअकरा हजारांहून अधिक जणांनी मत नोंदवलं त्यापैकी ५४ टक्क्यांहून अधिक लोकांनी गडकरी यांना पसंती दिली आहे.

 

भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी नुकतीच सात वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. नरेंद्र मोदींनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० मे २०१९ रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली त्यास दोन वर्षे पूर्ण होत आहेत,मोदी सरकारचं मूल्यमापन जनता कसं करते याचा अंदाज घेणारं एक सर्वेक्षण लोकसत्ता डॉटकॉमने २५ आणि २६ मे रोजी घेतलं. या सर्वेक्षणामध्ये ११,५१४ जणांनी मत नोंदवलं.

 

याच सर्वेक्षणामध्ये ‘तुमच्या मते भाजपाचा कुठला नेता पंतप्रधान म्हणून सर्वोत्कृष्ट आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर उत्तर देताना ५४.७ टक्के म्हणजेच ११,५१४ जणांपैकी ६ हजार ३०० जणांनी गडकरी हे सर्वोत्तम निवड असल्याचं मत नोंदवलं. त्या खालोखाल ३२.३ टक्के वाचकांनी नरेंद्र मोदी तर ०.७ टक्के वाचकांनी अमित शाह योग्य ठरतील असं मत व्यक्त केलं. मोदींना ३ हजार ७१९ जणांनी पसंती दिली तर शाह यांना केवळ ७७ जणांनी मत दिलं. गडकरी, मोदी, शाह यांच्यापैकी कोणताही नेता योग्य नसल्याचं मत नोंदवणाऱ्यांची संख्या १२.३ टक्के होती. एक हजार ४१८ जणांनी या तिघांपैकी कोणताही भाजपाचा नेता पंतप्रधान म्हणून चांगला नसल्याचं मत नोंदवलं.

 

नरेंद्र मोदी व अमित शाह हे दोघेच सरकार चालवतात व अन्य नेत्यांना फारसं महत्त्वाचं स्थान नाही हा आरोप पटतो का?, या प्रश्नाला उत्तर देताना ६४.६ टक्के वाचकांनी हा आरोप योग्य असल्याचं मत नोंदवलं आहे. ११,५१४ जणांपैकी ७ हजार ४३३ जणांनी होय मोदी आणि शाह दोघेच सरकार चालवतात आणि अन्य नेत्यांनी फारसं महत्वाचं स्थान नाही असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. या प्रश्नावर नाही मत नोंदवण्याची टक्केवारी ३३ (३ हजार ८०१ मतं) तर तटस्थ म्हणून मत नोंदवणाऱ्यांची संख्या २.४ टक्के (२८० मतं) इतकी आहे.

 

सर्वेक्षणामध्ये कोरोनासंदर्भातील प्रश्नांवर जनतेने मोदी सरकार व्यवस्थापनामध्ये अपयशी ठरल्याचंही मत नोंदवलं असून कोरोना नियोजनामध्ये केंद्र सरकारच्या कामावरील नाराजी उघडपणे व्यक्त केलीय.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.