जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी दागिने तयार करून देणाऱ्या बंगाली कारागिराने विश्वास संपादन करून १४ लाख ११ हजार ६४९ रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुनहा दाखल करण्यात आला आहे.
अस्ता तारक रॉय रा. मातोश्री बिल्डींग शनीपेठ जळगाव मुळ रा. पश्चिम बंगाल असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील राजकमल टॉकीजसमोर भंगाळे गोल्ड नावाचे सुवर्ण पेढी आहे. या सुवर्णपेढीसाठी अस्ता तारक रॉय हा दागिने तयार करून देत होता. गेल्या चार वर्षांपासून काम करत असल्याने भंगाळे गोल्डचे मालक यांचा विश्वास बसला होता. याचा गैरफायदा घेवून वेळोवेळी २४ कॅरेट सोने वेगवेगळ्या वजनाचे सोन्याचे तुकडे घेवून जावून त्यातील काही सोन्याचे दागिने रॉय याने भंगाळे गोल्ड येथे जमा केले होते. तर यातील काही दागिने रिपेअरींग करायचे देखील होते. यातील उर्वरित १४ लाख ११ हजार ६४९ रूपये किंमतीचे २७३.२६९ ग्रॅमचे वजनाचे सोने घेवून भंगाळे गोल्ड यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आकाश भागवत भंगाळे यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अस्ता तारक रॉय रा. मातोश्री बिल्डींग शनीपेठ जळगाव मुळ रा. पश्चिम बंगाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.