मोटरसायकल डिव्हायडरवर धडकल्याने दोन जण जागीच ठार तर एक जखमी…

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मोंढाळे रोडवरील स्विमिंग पुलवरुन परत येतांना मोटरसायकल डिव्हायडरवर धडकल्याने बुलढाणा जिल्ह्यातील एक व पाचोरा शहरातील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. ५ जुन रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक युवक जखमी झाला असुन त्याचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उमेर सत्तार बागवान (वय – १७) रा. हिदायत नगर, चिखली जि. बुलढाणा, अयान खान आमिन खान (वय – १५) रा. तकीया मुल्लावाडा, पाचोरा व साहिल सलिम शेख (वय – १५) या अक्सानगर, पाचोरा हे दि. ५ जुन रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एम. एच. २० डी. झेड. २९४१ या होंडा शाईन मोटरसायकलने मोंढाळा रोडवरील स्विमिंग पुलवर पोहण्यासाठी गेले. दरम्यान स्विमिंग पुलवरुन परत येत असतांना शहरातील जळगांव चौफुलीजवळील साईनाथ मार्बल समोर त्यांची मोटारसायकल डिव्हायडरवर जोरदार धडकल्याने या अपघातात उमेर सत्तार बागवान व अयान खान अमिन खान या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल सलिम शेख हा युवक जखमी झाला असुन त्याचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील व पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नलवाडे हे करित आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!