मेहुल चोक्सीसाठी गेलेले भारतीय अधिकारी रिकामे परतले

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्याच्या हेतूने डोमिनिकाला गेलेलं भारतीय पथक रिकामे  मायदेशी परतलं आहे.

 

देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिकामध्ये मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. यामुळे मेहुल चोक्सीचं डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु असून अधिकाऱ्यांचं एक पथक डोमिनिकात दाखल झालं होतं.

 

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यास त्याला आणण्यासाठी २८ मे रोजी भारतीय अधिकाऱ्यांचं पथक डोमिनिकात दाखल झालं होतं. यामध्ये सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. मेहुल चोक्सीला किमान अजून महिनाभर तरी डोमिनिकातच राहावं लागणार आहे. सध्या पोलिसांच्या सुरक्षेत त्याला रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.

 

मेहुल चोक्सी सध्या अटकेत असून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात कोर्टात सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे.

 

मेहुल चोक्सी याने कोर्टात एक याचिका केली असून पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर होती का? त्याला कोणत्या देशात परत पाठवलं जावं यावर सुनावणी सुरु आहे.  मेहुल चोक्सीने बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणं अशक्य आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.