पुणे : वृत्तसंस्था । डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे २२ बेडचे हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.
कपांऊडरने बोगस नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे हॉस्पिटल सुरू केलं होतं. कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र वार्डही तयार केला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे रुग्णालय चालवलं जात होतं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कपांऊडरचं बोगस डिग्री आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचं समोर आलं. त्याच्याकडे एमबीबीएस डिग्री असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर डॉ. महेश पाटील याचं मूळ नाव मेहबूब शेख असून, तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी असल्याचं उघड झालं. संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
शिरूरमध्ये डॉक्टर असल्याचं दाखवून २२ बेडचं स्वतः रुग्णालय चालवणाऱ्या कंपाऊडरची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने संपूर्ण माहिती दिली. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले,”पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की, मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असं वाटलं की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी मौर्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केलं. त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि नावही बदललं. त्याने बनावट डिग्री आणि आधार कोठून मिळवलं याचा तपास आम्ही करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरू केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे,” असं घनवट यांनी सांगितलं. पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.