मुख्याधिकार्‍यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

अमळनेर प्रतिनिधी | पाणीपट्टी न भरल्याने नळ जोडणी कापल्याच्या रागातून एकाने येथील मुख्याधिकार्‍यांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळ उडाला.

या संदर्भात माहिती अशी की, शहरातील, प्रबुद्ध कॉलनीतील मिलिंद अवसरमल याच्याकडे पालिकेची पाच ते सात वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टी अशी सुमारे ६० हजारांची थकबाकी आहे. त्यामुळे पालिकेच्या वसुली पथकाने त्याच्या घराची नळ जोडणी कापली. त्याचा राग आल्याने मिलिंद अवसरमल यांनी १० रोजी, पत्नी व मुलगी यांना सोबत घेऊन मुख्याधिकारी दालनात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाची धमकी दिली. अधिकार्‍यांनी त्याला पोलिसांकडे सोपवले. मात्र अवसरमल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी लेखी माफीनामा दिल्याने त्यांना ताकीद देऊन सोडण्यात आले.

या प्रकारामुळे मात्र नगरपालिकेच्या आवारात काही काळ गोंधळ उडाला. दरम्यान, मिलिंद अवसरमल यांनी त्यांच्या घरासमोरील गटार बंद करण्यात आल्याने, १ जानेवारीला नगरपालिकेत उपोषण केले होते. यामुळे ही समस्या सोडविण्यात आल्यानंतर त्यांनी सोमवारी आत्महदनाचा प्रयत्न केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.