मुक्ताईनगर प्रतिनिधी । गत अनेक दिवसांपासून पक्षातील काही नेत्यांविरूध्द उघडपणे नाराजी व्यक्त करणारे एकनाथराव खडसे आज भाजपच्या राज्यव्यापी निषेध आंदोलनात सहभागी झाले.
आज भाजपतर्फे राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे.
यात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे हे सहभागी झाले.
राज्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजवारा, कापूस उत्पादकांना योग्य तो दर दिला जावा असे मजकूर असलेले फलक हातात घेवून हे आंदोलन करण्यात आले. यात नाथाभाऊ व रक्षाताई यांच्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, नारायण चौधरी, योगेश कोलते, उमेश राणे, संदीप देशमुख आदी सहभागी झाले होते.
दोन दिवसांपूर्वी भाजपतर्फे प्रत्येक तालुक्यात सरकारविरोधी निवेदन देण्यात आले होते. याप्रसंगी एकनाथरा खडसे व खासदार रक्षाताई खडसे हे सहभागी न झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमिवर, आज या दोन्ही मान्यवरांनी आंदोलन सहभाग घेतल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.